Monday, May 27, 2019

कुणी ठेविले भरून

कुणी ठेविले भरून 
शब्दाशब्दांचे रांजण :
छंद लागला बाळाला 
घेतो एकेक त्यांतून . 

काही सुबक संगीत ,
काही पेलती मुळी न ,
काही जोडतो तोडतो ,
पाहतोही वाकवून . 

शब्द होतात खेळणी :
खेळवितो ओठांवर ,
ध्यानीमनी जे जे त्याला 
देऊ पाहतो आकार . 

कधी वाटते उणीव 
शब्द येईना मनास ,
घाली पालथे रांजण :
शब्दशोधाचा हव्यास 

आणि अवचित त्याच्या 
ओठावरी शब्द येतो :
शब्द त्याचीच घडण :
बाळ आनंदे नाहतो . 

अशा त्याच्या शब्दासाठी 
माझी उघडी ओंजळ :
शब्द शब्द साठविले 
जसे मेघांना आभाळ. 

: कुणी ठेविले भरून 
: बाहुल्या 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment