Thursday, January 3, 2019

फुलवेडी

नको टाकूस उसासा 
अशी दारात राहून :
वळचणीच्या अबोलीचा 
रंग जाईल उडून ;

अश्या शून्य नजरेने 
नको राहूं खिडकीशी :
वेध घेऊन डोळ्यांचा 
जाई होईल ग बाशी ;

नको घालू येरझारा ,
नको थांबू इथे तिथे :
तुझ्या पदरझळीने 
ताजी पाकळी गळते ;

हवा फुलांचा शेजार 
बाई हासत राहावे 
काळजाच्या कुपीमध्ये 
हवाबंद दुःख व्हावें . 

: फुलवेडी 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment