Wednesday, December 27, 2017

संध्याकाळी

संध्याकाळी 
वाट तुझ्यासारखीच होते 
दाट सावल्यांची 
लांबसडक वेणी 
तिरकस डोलाने 
रुळवीत वक्षावर 
आपल्या सामर्थ्याची 
असूनही सावध जाणीव 
धूसर तंद्रीचा घुंगट घेऊन जाणारी 

संध्याकाळी 
झाडे तुझ्यासारखीच 
लयधुंद , रुपमग्न होतात 
ज्यांच्या रंध्रारंध्रात 
असते थबकलेले 
एक नृत्य 

संध्याकाळी 
आकाश 
तुझ्यासारखे दूर असते ..... दूर नसते ..... 
असते सांगत काहीतरी डोळ्यांनी 
जे कळते ..... आणि कळतही नाही ..... 
जे नेहमी ठेवते 
निळ्या भटक्या तंद्रीत 
ज्याला 
एक पार्थिव सुगंध असतो 
तुझ्या सहवासासारखा. 

: संध्याकाळीं 
: उत्सव 
: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment