Monday, November 20, 2017

तू गेल्यावर

ओठावरचे स्वप्निल हासू 
    फुलाफुलांवर जाते रंगून ;
डोळ्यांमधले अधुरे आसू 
    हळूच भरती मधू कोषांतून ;

शब्दांमधले अस्फुट लाघव 
    रानपाखरे घेतीटिपुनी ;
सळसळणारे अन अवखळपण 
     निळ्या आभाळी जाते उडुनी ;

रक्तामधली काळी बिजली 
    डोहामद्ये जाते मिसळून 
असते जे जे तुझ्याचसाठी 
    तू गेल्यावर जाते उधळून. 

- तू गेल्यावर नसते मीही,
    नसते माझे ..... माझे काही ; 
उरलेली ही अशी कोण मी 
    माहित मजला नाही .... नाही . 

: तू गेल्यावर
: मेंदी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment