Skip to main content

Posts

Showing posts from November, 2017

नुस्ती नुस्ती रहातात

प्रत्येक झाडाचे 
प्रत्येक पक्षी कसले तरी 
कसले तरी गाणी गातो 
प्रत्येक सूर 
पानाइतकाच झाडांनाही 
आपला आपला वाटतो 

गाणे गातात 
देणे देतात 
झडून जातात 
उडून जातात 

झाडे नुस्ती नुस्ती 
नुस्ती रहातात . 

: नुस्ती नुस्ती रहातात 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

पूर

तुझे गात्र गात्र :
पावसाळी रात्र ;
सारे क्षेत्र ऐसे 
झाले पूरपात्र 

माझे दोन्ही डोळे :
गाव झोपेतले ;
मला नकळत 
पुरात बुडाले 

हृदयाचे बेट :
कुठे त्याची वाट?
हातास लागावा 
एक तरी काठ !

: पूर 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

शोध

पृथ्वीची फिरती कडा चाटून 
कवितेची एक ओळ येते 
आयुष्याचा एक दिवस 
दानासारखा मागून नेते 

स्वतःपासून दूर जाता येते 
आरशापर्यंत तेवढेच 
हे शरीर आयुष्याने बांधलेले 
त्या सूत्रालाही अदृश्य खेच 

उभा जन्म पाठीमागचा उगाच 
सूर्योदयाचा डोंगर वाटतो 
पण संपूर्ण कवितेच्या शोधांतील 
तो हि एक सूर्यास्तच असतो . 

: शोध 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 


दुःख

तळहातावरील एक फोड 
गुलाब लावून थंड केला 
पण आज फक्त हातांतून 
फोड जाऊन गुलाब घळला 

ओल्याचिंब पायांतुन  घराच्या 
उमलून पसरलेली रात्र 
पायऱ्या चुकून घसरलेल्या 
जीवाचे दुखते गात्रनगात्र

चावऱ्या पापण्यांच्या केसांवरून 
चेहरा पांघरू न यावा !
हा वेश आठवणीसारखा 
क्षणभरही उतरूं न यावा !

: दुःख 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 


मुखरित गेलों

हाक ओठातली । मुखरिता यावी 
फुफ्फुसे राहावी । शुद्ध जरा 

जाणिवेचा ज्वर । डोळ्यांआड धूर 
पाहों नेदी घर । माझे मला 

खिडकीत दाणे । ठेवीतसे नेमे 
पंखी म्हणे देणे । फिटले रे 

समोर पाहिले । आंब्याकडे जेंव्हा 
पंखी गार हिर्वा । पक्व फळे 

हाक ओठातली । मुखरित गेलों 
शांताकार झालो । मूर्तिमंत 

: मुखरीत गेलो 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 


तू गेल्यावर

ओठावरचे स्वप्निल हासू 
    फुलाफुलांवर जाते रंगून ;
डोळ्यांमधले अधुरे आसू 
    हळूच भरती मधू कोषांतून ;

शब्दांमधले अस्फुट लाघव 
    रानपाखरे घेतीटिपुनी ;
सळसळणारे अन अवखळपण 
     निळ्या आभाळी जाते उडुनी ;

रक्तामधली काळी बिजली 
    डोहामद्ये जाते मिसळून 
असते जे जे तुझ्याचसाठी 
    तू गेल्यावर जाते उधळून. 

- तू गेल्यावर नसते मीही,
    नसते माझे ..... माझे काही ; 
उरलेली ही अशी कोण मी 
    माहित मजला नाही .... नाही . 

: तू गेल्यावर
: मेंदी 
: इंदिरा संत

आला क्षण-गेला क्षण

गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो पण;
गंभीरपणे घडय़ाळ बोले -
‘आला क्षण-गेला क्षण’

घडय़ाळास या घाई नाही,
विसावाही तो नाही पण;
त्याचे म्हणणे ध्यानी घेई -
‘आला क्षण-गेला क्षण!’

कर्तव्य जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे -
‘आला क्षण-गेला क्षण’

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणीत घण,
काळ -ऐक! गातो आपुल्याशी
‘आला क्षण-गेला क्षण!’

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करती -
‘आला क्षण-गेला क्षण’

आनंदी आनंद उडाला,
नवरीला वर योग्य मिळाला!
थाट बहुत मंडपात चाले -
भोजन, वादन, नर्तन, गान!
काळ हळू ओटीवर बोले -
‘आला क्षण-गेला क्षण!’

‘कौतुक भारी वाटे लोकां
दाखविण्या पाहण्या दिमाखा,
तेणे फुकटची जिणे होतसे!
झटा! करा तर सत्कृतीला!’
सुचवीत ऐसे, काळ वदतसे -
‘क्षण आला, क्षण गेला!’

वार्धक्य जर सौख्यात जावया
व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते,
ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते-
‘आला क्षण-गेला क्षण’

: केशवसूत

एक अश्रु

स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी 
श्रुंगारली आळी, झगमगे || 
तोरणे, पताका, सांगती डोलुन 
स्वांत्र्याचा दिन, उगवला ||
स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले? 
पुर्वज श्रमले, तयासाठी ||
वृक्ष लावणारे, निघोनिया जाती 
तळी विसावती, सानथोर ||
विचारी गुंतत, हिंडलो बाजारी 
पेठेत केवढी, गजबज ||
केवढी धांदल, केवढा उल्हास 
केवढी आरास, भोवताली ||
मात्र एका दारी, दिसे कोणी माता 
दीप ओवाळीता छायाचित्रा ||
ओल्या नेत्रकडा हळुच टिपुन 
खाली निरांजन, ठेवीत ती ||
हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कानी 
चित्त थरारोनी, एकतसे ||
होते लखाखत, पेठेतले दीप 
आकाशी अमूप, तारा होत्या || 
चित्तापुढे माझ्या, एक दीप होता
एक अश्रु होता, माउलीचा. || : वि. म. कुलकर्णी