Sunday, September 10, 2017

मिटुनी घेतलें

 मिटुनी घेतलें डोळ्यांत तुला 
मुळी न कुणाला कळलें काही 
रात्र जरी ओसरली तरीही 
रात्र मुळी ओसरली नाही 

 मिटुनी घेतलें ओठात तुला 
मुळी ना कळले शब्दानाही 
जशी दवांतून रात्र मिटावी 
कळू नये पण रात्रीलाही 

 मिटुनी घेतलें रक्तांत तुला 
मोरपिसे बोटांची झाली 
मिटल्या डोळ्यांनी ओठाना 
त्या रक्ताची शपथ घातली 

 मिटुनी घेतलें माझ्यात तुला 
सर्वस्वाचा जिथे पहारा 
तुझ्यात मी ओथंबून बुडालो :
गाढ जळांतुन पहाटवारा . 

: मिटुनी घेतलें 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment