Monday, September 25, 2017

दान

त्याचे त्याला देऊन टाक 
बाकी ठेवू नको काही :
मला देणार होतीस जे 
त्याचा हिशोब होणार नाही 

देणार होतीस असे काही 
आभाळ देखील लाजावे 
घेणार होतो असे काही 
पृथ्वीनेही बघत राहावे ..... 

सारे आभाळ सांगण्यासाठी 
पाण्यापाशी शब्द कुठे?
शब्द आणि अर्थ यांत 
घुमी रात्र उभी इथे 

गाण्यांमधून वहात राहील 
आभाळावेडी तुझी खूण
वृत्ती वृत्ती जपत राहील 
तुझ्या नेत्रांमधले ऊन 

त्याचे त्याला देऊन टाक 
बाकी ठेवू नको काही :
माझ्यासाठी स्वच्छ ऊन 
स्वच्छ स्वच्छ दिशा दाही 

: दान 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment