Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

तू नको

मला वाट पहायची आहे... 
तुझे घर झाकू नको - शपथ आहे 
गजबजल्या तुझ्या घरादाराची 
माझ्या उरावरील वाराची 

अजून आहे डोळ्यांसमोर एकाच ओळ 
दूर वहात गेल्या तुझ्यामाझ्या दिव्यांची :
एक दिवा तुझा होता 
तर एक माझा होता 
दोन्ही दिवे तेववणारा हात मात्र 
तुझाच होता .... तुझाच होता 
मला वाट पहायची आहे ... 

: तू नको 
: दिवेलागण 
: आरती प्रभू

उत्सव

रानावनांतले 
कसकसले 
ओलेसुके वारे 
असतील आले 
काळजाच्या एखाद्या स्पंदनांत ;
पण कधी बापड्याच्या 
दारावरील वेलीने 
हरवली नाहीत पाने 
कळ्यांच्या संभ्रमात 

कृष्णपक्षातील 
भरगच्चं गच्चीतील 
काळोखात एकदाच 
छकुल्याच्या पाळण्यासारखेच 
हलले मात्र त्याचे काळीज 
म्हणाला शांताकारांत 
आयुष्य सोडून :
"कुणी करावी गेल्या दिवसांची बेरीज ..."

: उत्सव 
: दिवेलागण 
: आरती प्रभू

उभें मात्र थेंब रक्त

हरखून पहावे तो 
    रात्र उतरे  डोळ्यांत ;
लाख स्मृतींची टाचणी 
     भिजे चांदणीविषात. 

बोलावा तो शब्द काही 
     क्षितिजाचे व्हावें ओठ 
त्यांना जखम मौनाची 
    उभें मात्र थेंब रक्त. 

: उभें मात्र थेंब रक्त 
: मृगजळ 
: इंदिरा संत

डोळ्यांच्या काळ्या डोहावर

डोळ्यांच्या काळ्या डोहावर 
थरथरले नव्हते पाणी;
ओठही नव्हता हलला. 

मागितले नव्हते मी काही 
    - मागणारही नव्हते ;
क्षितिजावरचे 
झुळझुळणारे वेडे मृगजळ 
मजला झुलवीत नव्हते . 

          दिलास  तू पण 
आभाळाचा शाप भयंकर ,
या क्षितिजाहून ..... त्या क्षितिजावर 
ज्याच्यामध्ये 
तुफान नुसते गद्गदणारे. 

: डोळ्यांच्या काळ्या डोहावर 
: मृगजळ 
: इंदिरा संत

ठाऊक तुजला

ठाऊक तुजला 
अपुल्यामधले अंतर . 
एकापुढती एक असे हे 
         अपुल्यामधले 
अनेक मृगजलसागर ...... 

आणि तरीही 
तुझे खुणेचे शुभ्र कबुतर 
तरंगते का निळ्या आभाळीं ?
कशास त्याच्या पायी घुंगुर;
कशास त्याच्या टोचीमध्ये 
          अंगठीचा मोती ?

कधी न त्याला दिसायचा पण 
स्वप्नकिनारा 
आणि किनाऱ्यावरची मीही . 
          वाट पहातां 
अंगावरती चढली माती 
ये धरतीपण ...... 
शीळ घालण्या उधाणलेल्या 
          मनास माझ्या 
त्या मातीचे आता बंधन . 

: ठाऊक तुजला
: इंदिरा संत 
: मृगजळ 

उंबरठ्याशी

उभे राहूनी उंबरठ्याशी 
निरोप द्यावा क्षितिजापाशी ;
सुकलेल्या अश्रूत धराव्या 
कभिन्नश्या मेघांच्या राशी. 

उभे राहूनी उंबरठ्याशी
निरोप द्यावा क्षितिजापाशी. 
ओठावरल्या निःशब्दाचा 
पहाड दाटुन  उभा असावा 
    अथांग झेलित 
उंबरठ्याची मृगजलराशी . 

: उंबरठ्याशी
: इंदिरा संत 
: मृगजळ सुख

असें तसें माझे सुख 
    पाखडाव्यात चांदण्या ;
कणीसाठी उतराव्या
     कल्पतरूच्या चिमण्या. 

असें तसें माझे सुख 
    घरकुलीत मावेना 
उतू जाते भसाभसा 
    मन परी का विझेना ?

: सुख 
: मृगजळ 
: इंदिरा संत 

भरात ..... नकळत

भरात ..... नकळत 
असह्य दुर्दम दुःख ठिबकले 
               ओठावरती. 
तप्त निखाऱ्यावर विझताना 
               तडफडणाऱ्या 
त्या दुःखाने मला शापिलें. 
तेव्हापासून 
सदा सारखी हसते ..... हसते 
               दुःखवेगळी. 

: भरात ..... नकळत     
: मृगजळ 
: इंदिरा संत 

काय बाई सांगू कथा

"काय बाई सांगू कथा ,
     क्षण विसावा भेटतो ;
गुलबाशीच्या फुलासंगे 
     पुन्हा दीस उगवतो . 

काय बाई सांगू कथा"
     पाणी आणून डोळ्यांत 
एव्हढेच बोलली ती 
     घागरीला हाथ देत 

: काय बाई सांगू कथा 
: मृगजळ 
: इंदिरा संत 

उपसावें....उपसावें

उपसावें....उपसावें 
आसूओल्या पापण्यांनी 
डोहांतील काळें पाणी. 

डोहांतील काळें पाणी
उपसतां उपसेना ;
तळ स्वप्नांचा लागेना. 

तळ स्वप्नांचा लागेना
तरी ध्यास मनापाशी 
उपसावें पाणी .... पाणी 
भिडलेले क्षितिजापाशी. 

क्षितिजाशी चंद्रबिंब 
काळ्या पाण्याच्या धारेत 
उंचावली लाट माझा 
पाय ओढते पाण्यात. 

: उपसावें....उपसावें 
: मृगजळ 
: इंदिरा संत