Thursday, June 15, 2017

अशब्दा

तूही अशब्दा 
मीहि अशब्दंच. 
श्लोकावाचून घडले आहें 
शतकांडांचे हे रामायण. 
अक्षरही नसता दिमतीला 
दोन मनावर पूल बांधला 
होता आपण ,
पहाडातल्या ढगाप्रमाणे 
खडकावर झाडावर पिंजून 
पडलो आपण , 
षड्जावाचुन रचली गीते 
देहावाचून रतलो आपण 
वेदांमधल्या तरुण उषेसम 
कनकाचा रथ घेऊनि गगनी 
स्तब्ध किनाऱ्यावरी निशेच्या 
फिरलो आपण . 
आता ते सरल्यावर सारे 
त्या सर्वांची 
करावयाला जणू भरपाई 
मधल्या रात्री 
एकांताच्या तळघरात मी 
घालीत बसतो 
शब्दांच्या ऐरणीवरी हे 
शब्दांचे घण !

: अशब्दा 
: वादळवेल 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment