Friday, May 26, 2017

समाधान

क्रोधाने केधवा 
काजळता मन 
यातच सांत्वन 
   लाभो मज !
खुजांचा मेळावा 
मूर्खांची मिजास 
अंधांचा प्रवास 
   अंधारात . 
ऐशाच्या गर्दीत 
व्हावे निवोदन 
कायसा दहन 
   अंतराचे ?
वारुळाशी उभे 
राहुनी बघावे 
कीटकांचे थवे 
   लीला त्यांच्या . 
अफाट विस्तार 
अहंतेचा होता 
सर्वत्र क्षुद्रता 
   (खरीखोटी)
धुराचा विशाल 
स्तंभ उंचावत 
होई गगनात 
   मेघरूप !
माझ्या आत्मतेची 
कणिका ही तैशी 
वाढत तत्वांशी 
   एक व्हावी . 
माझ्यातच राहे 
विश्वाची राणीव 
होता ही जाणीव 
   काय केवा ?
बाहुल्याच्या जगी 
जाता गलिव्हर 
केवळ ये भर 
   विनोदासी !

: समाधान 
: किनारा 
: कुसुमाग्रज 


No comments:

Post a Comment