Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

शरीर

मला वाटते शरीर माझे , जाणवते पण -
असे कधी की मी शरीराचा , धनी असे ते 
घटात पाणी आकारित हो घटाप्रमाणे 
धाग्याचें धागेपण अवघें पटात विरते . 

: शरीर 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज 

मालक

मी शब्दांच्या घालूनि बसतो अमाप राशी 
जखमी होता धावत जातो शब्दांपाशी 
शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे  
जनावराने काबिज केला हा दरवेशी 

: मालक 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज 

असेच येती

असेच येति कुणी , नावही 
   माहित केव्हा ज्यांचे नसते 
गळ्यात गहिवर , नयनी पाणी 
   स्नेहसुमन ओठावर असते 

या कवितेने हिरावले जर 
   जीवनातले असेल काही 
क्षण असले हे अनंत हस्ते 
   भरपाईस्तव दिले तिनेही 

असेल कोणि निघून जाता 
   मनात शंका दाहक ये पण -
चिखलाच्या ओंजळीत पुष्पे 
   जाईजुईची घेता आपण.    

: असेच येती 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज 

थेंब

अनंतेंचे गहन सरोवर 
त्यात कडेला विश्व्कमल हे 
       फुले सनातन 
   त्या कमळाच्या 
   एक दलावर 
   पडले आहे 
   थोडे दहिवर 
थरथरणाऱ्या त्या थेंबाला 
पृथ्वीवरचे आम्ही मानव 
       म्हणतो जीवन . 

: थेंब 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज 

श्री

पूर्वी श्री असलेला ईश्वर 
     झाला आहे श्रीयुत आता 
विचारतो  "मी आत येऊ का ?"
     दरवाजातून अपुल्या येता . 

सभ्यपणाचा रिवाज सारा 
     बंधनकारक तयास होई 
भलत्या जागी निमंत्रणाविन 
     अवतरण्याची त्यास मनाई 

सम्राटासम चराचरातूनी 
     होता पूर्वी संचारत तो 
शिफारशींची घेऊनि पत्रे 
     संकोचाने आता फिरतो 

: श्री  
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज 

पक्षपात

तृणातृणाच्या दलावरी तंव 
     प्रगटे नावनिशाणी 
दहा दिशांच्या भव्य पटावर 
     लिहिली तीच कहाणी 

नक्षत्रांच्या प्रकाशाक्षरी 
     नाव तुझे झळझळते 
सागर पर्वत वृक्ष घनावर 
     तव हस्ताक्षर दिसते 

चहूकडे या भवावरी तव 
     मुद्रानाम विराजे 
सहीविना का रिते ठेविले 
     एकच मानस माझे ?

: पक्षपात 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज 

समाधान

क्रोधाने केधवा 
काजळता मन 
यातच सांत्वन 
   लाभो मज !
खुजांचा मेळावा 
मूर्खांची मिजास 
अंधांचा प्रवास 
   अंधारात . 
ऐशाच्या गर्दीत 
व्हावे निवोदन 
कायसा दहन 
   अंतराचे ?
वारुळाशी उभे 
राहुनी बघावे 
कीटकांचे थवे 
   लीला त्यांच्या . 
अफाट विस्तार 
अहंतेचा होता 
सर्वत्र क्षुद्रता 
   (खरीखोटी)
धुराचा विशाल 
स्तंभ उंचावत 
होई गगनात 
   मेघरूप !
माझ्या आत्मतेची 
कणिका ही तैशी 
वाढत तत्वांशी 
   एक व्हावी . 
माझ्यातच राहे 
विश्वाची राणीव 
होता ही जाणीव 
   काय केवा ?
बाहुल्याच्या जगी 
जाता गलिव्हर 
केवळ ये भर 
   विनोदासी !

: समाधान 
: किनारा 
: कुसुमाग्रज