Thursday, March 2, 2017

उदासबोध

आज हयात असते रामदास
तर भोवती बघून हरामदास,
अंतरी झाले असते उदास
लागोन चिंता.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे,
त्यांचेवरी संरक्षणछत्र आहे
पोलीस, पुढा-यांचे.
या सत्याचा लागता शोध,
कुठून सुचता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध
श्रीसमर्थांनी.
भ्रष्टाचारे पोखरला देश,
दीन जनांसि अपार क्लेश,
दुर्जनां यश, सज्जनां अपेश
सर्वत्र दिसे.
नीतीचा डोळा काणा,
प्रत्येक माणूस दीनवाणा,
सर्व फोलकटे, नाही दाणा,
पीक ऐसे.
देवतांसि उचलून धरती,
वेडेविद्रे नाच करती,
भसाड, ओसाड आरती
झोकून दारु.
कबीर सांगे अल्लाची महती,
मुंगीच्या पायी घुंगुर वाजती
तरी ते अल्लासि ऐकू येती
ऐसे म्हणे.
येथे अल्लासि बहिरा मानती,
ठणाणा ध्वनिक्षेपक आणती
त्यातून कर्कश बांग हाणती
अल्लासाठी.
कंडम बर्गड्यांच्या जनतेवरी
बिल्डर, स्मग्लर, गुंड राज्य करी,
प्रत्येक नेता खिसे भरी
हाती धरोन तयांसि.
दुष्काळ खणी, भुई फाटे,
शोष पडून विहीर आटे,
काळा कडू गहिवर दाटे
गळ्यात भविष्याच्या.
सत्य सामोरे पाहण्यासाठी
त्राण असावे लागे गाठी,
भेकड पळपुट्याचे पाठी
हिजडा लागे.
ग्रंथा नाम उदासबोध,
कविजनतेचा संवाद,
काळा कडू आतला विषाद
हलका केला.       
इति श्रीउदासबोधे कविजनतासंवादे उदासबोधनाम समास

: मंगेश पाडगावकर

No comments:

Post a Comment