Thursday, March 2, 2017

फुंकर

बसा म्हणालीस - मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस्सं.. इतकेच... बाकी मन नव्हते थाऱ्यावर
दारावरचा पडदा दडपित तू लगबग निघून गेलीस माजघरात
माझ्यासोबत ठेवून तुझ्या शुष्क संसाराच्या निशाण्या ..
या जाळीच्या पडद्याआड कशाला कोरले आहेस
हे हृदय उलटे उत्तान ?
काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस भूश्शाच्या राघुमैना ?
उडताहेत लाकडी फळांवर कचकड्यांची फुलपाखरे
भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने
काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा
त्यातला एक जरी टाका चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो
तू विचारलेस -काय घेणार ?
काय पण साधा प्रश्न - काय घेणार?
देणार आहेस ते सारे पूर्वीचे ?
मला हवे आहेत चिंचेचे आकडे - ते अधाशी ओठ, ती कुजबूज त्या शपथा
दे झालं कसलंही साखरपाणी
तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे
तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे
बळकट बाहू, रुंद खांदे,डोळ्यांत कर्तेपणाची चमक छान आहे
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही
मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने निदान एक वाक्य -एक जहरी बाण
ते मला जमले नाही
आणि तू तर नुसती हसत होतीस
आता एकच सांग --
उंब~यावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले
इतकी का तुला सुपारी लागली ?
पण ... नकोच सांगूस
तेवढीच माझ्या मनावर एक...फुंकर
: वसंत बापट


No comments:

Post a Comment