Thursday, February 23, 2017

अस्तशेज

एवढे उदास फुल पाहिले कधी न मी
शिळे जशी तुझ्या कुळास चंद्र दे निळी हमी ...
दे ढगास रंग्भूल जीव अंथरून सांज
पावसातही मुली जशा उभारतात शेज.
नदीस काठ एकदाच हो पुरात पारखा
जा मुली निघून तू जिथे उभा तुझा सखा.
विभक्त हि सखी मला अजून स्पर्श मागते
कातडीतलेच दु:ख आतड्यात तोलते...
पहाडमग्नता तशी दिशादिशात साकळे
नि घाट राउळातही निनादतात कावळे...
थकेन वाटले मला म्हणून ओल घेतली
नि स्वप्नसत्य सारणी मुकीमुकीच राहिली.
उरातली अखंडताच का पिळून आवळे ?
तंग कंचुकीस कोण सोडणार मोकळे?
तेल या दिव्यातले न ज्योत त्या दिव्यातली
जसा पुढे करून देह माग घेत सावली...
मला न ये जरा रडू न काळजातही चरा
वृक्ष मोडताच तो मनात झेल पाखरा .
मागधी; तुला न बोल चांदणी मिटेवरी,
लहानसाच अस्त हा सजेल माझिया घरी...
-ग्रेस

No comments:

Post a Comment