Saturday, October 22, 2016

शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,
भरे निळी नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली
भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,
गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,
भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे
शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.

: जोगवा
: आरती प्रभू