Wednesday, July 27, 2016

चाफा

रंगीत फुलांचा गंध
झरे घन मंद
माझिया हातीं
डोळ्यात चंद्र
चंद्रात मंद्र;
चांदणे हरवले भवती
काळीज उमलती शीळ
जळे घननीळ
कुण्या स्मरणाशी
पाणीच असे व्याकूळ पिसे;
वाहते गडे चरणाशी

: चंद्रमाधवीचे प्रदेश

: ग्रेस

उर्मिला

त्या दाट लांब केसांचा
वार्यावर उडतो साज
दुक्खात अंबरे झुलती
की अंग झाकते लाज
तरि हळू हळू येते ही
संध्येची चाहूल देवा
लांबती उदासिन क्षितिजे
पाण्यात थांबल्या नावा
देहास आठवे स्पर्श
तू दिला कोणत्या प्रहरी ?
की धुके दाटले होतें
या दग्ध पुरातन शहरी
सुख असे कळीतुन फुलते
व्यापतो वृक्ष आभाळ ;
छायाच कशा दिसती मग
आपुल्यापरी खडकाळ ?
आटले सरोवर जेथे
का मोर लागतो नाचू ?
तू सोड उर्मिले आतां
डोळ्यांत बांधिला राघू

: संध्याकाळच्या कविता

: ग्रेस

मात्रृवनातील सावल्या

शब्दांनी हरवुनि जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल
गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल
तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ

: चंद्रमाधवीचे प्रदेश

: ग्रेस