Friday, April 24, 2015

समुद्र

माझ्यासोबत समुद्राच्या
खाऱ्या खाऱ्या बाता येतील
मला शोधत जाल तर
अनेक वळणवाटा येतील
मी जसा आहे तसा
प्लीज नका पाहू मला
माझा फोटोच काढाल तर
त्यांत फक्त लाटांच येतील

अश्रूंमध्ये मिसळलेल्या
पाण्याच्या या गाण्याचं
वयासोबत आणखी आणखी
खारट खारट होण्याचं
आभाळाला प्रश्न पडतो
रोज वरून बघताना
वय काय असेल बरं
समुद्राच्या पाण्याचं ?

माझ्यासोबत समुद्राच्या
खाऱ्या खाऱ्या बाता येतील
कधी गॉसिप्स , कधी गप्पां
कधी तुम्हाला गातां येतील
माझ्यामध्ये भिजायचं तर
किनाऱ्यावर उभे रहा
जेव्हां भरती येईल तेव्हां
लाटाच उठून स्वतः येतील

No comments:

Post a Comment