Tuesday, April 21, 2015

उंबरा

उतरून आली रात्र
दिवा ठेवी उंबऱ्याशी
जरतारी पायघडी
येणाऱ्याच्या  पावलांशी

येतो मिश्कीलसा वारा
टाकी मालवून ज्योत
चांदण्याचे पाय ज्याचे
त्याला कायसा हा झोत ?

दवे न्हाणीला उंबरा
वर रेखिली रांगोळी
कुंकू- हळदीची तशी
बोटे लाविली कोवळी

आला मिश्किल किरण
वर शिंपतो गुलाल
जडभारी जाते पाय
पंख रंगीत होतील

: उंबरा
: चित्कळा
: इंदिरा संत

No comments:

Post a Comment