Saturday, April 11, 2015

फेडुन घळली

सखी पारखी होता होता
उसने देई मज परकेपण ;
जपता जपता इथे मोगरा
फेडुन घळली जुई गंधऋण

शिंपण झाली होती जेव्हा
सुस्त सुखाची अघळपघळशी
दुखली होती खोल बाहुली
काजळ रेखांतून जिवाशी

माझ्यापाशी नव्हते काही
दुरून जगणे होते केवळ
आरशातले महाल सारे
उल्लंघून मज आली भोवळ

सखी पारखी होता होता
घेत हिरावून अथांग मीपण
फक्त किनारा पायांखाली
दिसते थोडे क्षितीज -लांबून

: फेडुन घळली
: जोगवा
: आरती प्रभू

No comments:

Post a Comment