Friday, February 27, 2015

अजूनही

निळ्या जांभळ्या नदीला
आंबेवनाची सावली
भेट पहिलीवहिली
अकल्पित .

भेट दूरस्थपणाची
गर्भरेशमी क्षणांची
सौदामिनीच्या बाणांची
देवघेव

गुलबक्षीच्या फुलांनी
गजबजले कुंपण
वेचू लागला श्रावण
मोरपिसे .

ओल्या आभाळाच्या खाली
इंद्र्चापाचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास .

कधी रेताडीचे रस्ते
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारंगीचे तात
साथ झाली .

बर्फवाट शिशिराची
आता पुढलीया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही

: अजूनही
: छंदोमयी
: कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment