Sunday, May 12, 2013

कहाणी


एका परीची कहाणी 
जिच्या डोळा आले पाणी 

परी कधी रडत नसते 
फुलत असते , हसत असते 
तिथे दुखः कुठून येणार ?
तिच्यासाठी यक्ष गाणार 
फुलांमधून दव प्यावे 
स्वप्नातच गुंगत जावे 
अवती भवती झरयांची गाणी 
हि तर होती परयांची राणी 
दाह नाही .... आग नाही 
दुःखाची जाग नाही 

एक दिवस काय झाले ?
नदीकाठी कोण आले ?
त्याच्या डोळ्यात स्वप्न होते 
पाय धुळीने भरले होते 
तीच होती त्याची खुण
संपली नाही वाट अजून 

परी तिथे का आली ?
मागोमाग का गेली ?
वाजले नाही तिचे पाऊल ?
- सावलीसारखी तिची चाहूल 
का आली त्याच्यापाशी ?
पृथ्वीवरच्या माणसाशी 
परी कधी बोलत नसते 
हि का हसली ?
हि का बोलली ?
पुन्हा पुन्हा तिने जावे 
डोळे भरून त्याला प्यावे 
कधी कधी स्तब्ध राही 
नुसती पाण्याकडे पाही 
शब्द असून अबोल होते 
सांगण्यासाठी काहीच नव्हते 
तरी सांगून संपत नव्हते 

माणूस म्हणे ," कशासाठी 
छळ माझा? सुखासाठी ?
ऐकले आहे परया अशा 
माणसांना करतात पिश्या 
मग खिदळत जातात उडून 
माणूस बसतो मरणात रुतून..."
यावर परी स्तब्ध राही 
नुसती पाण्याकडे पाही 

परी घरी येत नसे 
कशात तिचे लक्ष नसे 
फुलांमधला रुसला गंध 
झरयामधला अडला छंद 
परीचा राणा जवळ आला :
" सांग सांग काय झाले ?
फुल अबोल का बनले?
खिन्न का माझ्या फुला ?
मागशील ते देतो तुला 
चंद्रलोकात तुला नेतो 
चांदणीची होडी देतो....."
यावर परी स्तब्ध राही 
नुसती पाण्याकडे पाही

एके दिवशी नदीकाठी 
त्याचा हात घेवून हाती 
तिने सारे सांगितले 
मागू नये ते मागितले 
प्राणामधली जखम रोखून 
तो म्हणाला तिला हसून:
" आभाळा एवढे तुझे ऋण 
फिटणार नाही जन्म उधळून 
पान आत्ता परतून जा 
सारे काही विसरून जा 
तुझे जग वेगळे आहे 
माझे जग वेगळे आहे 
माझ्या जगात करपतात ओठ 
तोंडात काळोखाचा घोट 
दगड होतात ताऱ्यांचे
नीजेवरती  वीज पडते  
फुलांची मान मोडते 
पुन्हा कधी येऊ नको 
पुन्हा कधी पाहू नको ....."

" कधीच का येऊ नको ?
कधीच का बोलू नको "

" विसरून जाशील सारे काही 
तुझ्या जगात शाप नाही
तुझे जग वेगळे आहे 
माझे जग वेगळे आहे "

परताना मागे वळून 
परी म्हणाली जर थांबून :
" काही तरी देवून जाईन
माझी आठवण ठेवून जाईन 
देवून जाते तुला गाणे 
गेल्या जन्मीचे हे देणे 
गाणे देते ताऱ्यांचे 
झर्यांचे, वाऱ्यांचे
न बावणाऱ्या फुलांचे 
सावल्यांच्या झुल्यांचे 
खोल खोल मनात ठेवशील?
तू मला काय देशील?"

प्राणामधली जखम रोखून 
तो म्हणाला तिला हसून
" माझ्यापाशी आहे काही 
जे तुझ्या जगात नाही ....."

" मी तर आहे पऱ्यांची राणी 
माझ्या जगात सुखाच्या खाणी 
जे माझ्या जगात नाही 
असे असेल असे काही ????"

" माझ्यापाशी दुखः आहे 
माझ्या डोळ्यात अश्रू आहेत 
तोच तुला देऊन जाईल 
माझी आठवण देऊन जाईल 
माझ्या अश्रूत गाणे येईल 
तुझ्या गाण्यात श्रु राहील ....."
आणि परीने वर पाहिले 
तिचे डोळे भरून आले 
पुन्हा काही बोलली नाही 
मागे वळून पाहिले नाही 
स्वतःलाच  विचारून पाही 
तिला उत्तर मिळाले नाही 

परयांनाहि प्रश्न पडतात 
ज्यांची उत्तरे मिळत नसतात 
अशी हि परीची काहाणी 
जिच्या डोळा आले पाणी 

: कहाणी 
: उत्सव 
: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment