Sunday, January 6, 2013

येईन एकदा पुन्हा


पल्याड काळोखाच्या
जाण्याआधी
घेऊन अंगभर ओळख :
सगळ्या फुलल्या खुणा
येईन एकदा पुन्हा
घुंगुरवाळ्या पाण्यापाशी

निःशब्द भरारिपरि पक्षांच्या
असतील डोळे
पंखोत्सुक असतील झाडे सारी

असेल तेव्हा पहाटहि
पिसाहूनही हलका वारा
पाण्यावरती
तशी तंद्री आभाळाची
आणिक तुझ्या
डोळ्यांच्या काठाशी
वाजेल न वाजेल असे
पाउल माझ्या श्वासांचे
सांगाण्याही आधी
अबोल होतील शब्द
कळ्यास तेव्हा
असेल घाई फुलण्याची
अर्ध्या उघड्या डोळ्यांचा
बावरा सुगंधही
असेल थबकून
घुटमळताना श्वास तुझे
ओठांवर... गालांवर ...

होता पक्षी
निळ्याभोर पंखांचा
लुकलुक खळखळ डोळे
ओठांवर शीळ चांदणी इवली
पर्युत्सुक पिसे.....

आणि एकदा
काळोखाच्या वेळी
निळ्याभोर पंखांचा पक्षी
खिळवून बसला डोळे
दृष्टीच्याही पल्याड अगदी ......
पंखही हलविणा
शीळहि फुलविना
फांदीच्याही डोळा आले
दाटुनिया दंव
का अवचित झाले डोळे
तिन्साञ्जेच्या पाण्यापरी ते
भयस्तब्ध अनं खोल ?
का शिळहि भिरभिर
झाली प्रौढ अबोल ?

का मिटुनी पाने फांदीने
हळूच लपविले अश्रू ?

येईन एकदा पुन्हा
घेऊन अंगभर ओळख
सगळ्या फुलत्या खुणा .....
मनभर सगळी फुले
त्यांच्याही पाकळ्या कोमेजती का
लागून धग ओंजळीची ?
विसरतील का हे डोळे तेव्हा अश्रू ?
क्षणभर तरी त्यावेळी
ती शीळ चांदणी इवली
लुक्लुकेल न ओठी ?......

दिशा स्तब्ध
पान पान स्तब्ध
फक्त अंगभर माझ्या
रिमझिम ओळख

: येईन एकदा पुन्हा
: उत्सव
: मंगेश पाडगावकर

No comments:

Post a Comment