Tuesday, November 13, 2012

पानगळ...

गुलाबी थंडीचे दिवस . हळुवार 
स्वप्नांचे दिवस. 
आयुष्य थांबून राहिल्याचा गोड भास...
श्वासांचे प्रबंध करण्याचे वय..
रेशीम धाग्यांनी गुंफलेलं अलवार नातं ....
ऋतूंचे सोहळे साजरे करतानाच हळव्या पानगळीत हरवलेलं मन - सैरभैर ...

संपलेपणाची बोच - स्वप्नांच निर्माल्य ,
एक एक शुष्क पान जीवापाड जपण...
मनाच्या चोरकप्यात !
कुठल्यातरी एकांत अन हव्याहव्याशा उदास क्षणी हा मनोहारी चोरकप्पा अलगद उलघडायचा -
एक चाळा म्हणून कि , पुनः प्रत्ययाचा आनंद म्हणून काहीच आकळत नाही .
...... ऋतूचक्राबरोबर पुन्हा फिरून येणारया बहरासाठी पानापानांनी गळून जायचं ...
आपल्याच दिमाखात .....बहराच्या स्वागतासाठी कि एक अटळ सत्य म्हणून ???
मनाची बेचैनी अधिकच वाढते ....सायंकाळी लांबच लांब पंगत जाणाऱ्या सावल्यांची मनभर धास्ती वाटून राहते उगाचच......
पानगळीच्या या हळव्या क्षणी आपण सोबत असावं आधीचाच जीव टांगणीला लागलेला....अनामिक पानगळीन जीव गलबलून जातो ...
मनभर आठवणींच काहूर दाटताना फांदी फांदी डोळ्यादेखत निष्पर्ण होते .....
......दुःख पानगळीच नसतंच मुळी . पानगळीचे संदर्भ असतात तुटलेल्या स्वप्नांशी , पानगळीच्या ऋतूत एक-एक पान गळताना हे संदर्भ
आपसूकच जुळत जातात ...विषण्ण होतं ... फांद्याही एकाकी वाटू लागतात ...
बहरांच्या ऋतूमध्ये स्वतः मध्येच हरवलेल्या फांद्या आताश्या आत्ममग्न होताना चुकार पाखरही काही हितगुज करतात ...
कि सांत्वनांचे बेगडी शब्द ..... कुणास ठाऊक ???
जीवघेणी पानगळ वावटळीत सापडते अनाहूतपणे -गोल गोल घुमत रहाते
आसमंतभर -वेड्यागत .....
...कातरवेळी दूर कोणी फकीर गात असतो - कधीच.....
त्याचे ओलेचिंब स्वर सद्गदित करतात, त्याच्याशी अनामिक नातं जुळून जातं .
काळोख दाटल्या आभाळाकडे पाहात पाहात तोही वेड्यासारखा गात रहातो.....क्षणभर डोळ्यांच्या कडा
ओलावतात .... का कोण जाणे तो मग पोरका वाटू लागतो ....
एखाद्या अभोगी पहाटेला पानगळ दुक्यातून हरवून जाते .....
दूर पर्यंत अन कुणाच्या साखरझोपेत गुलाबी स्वप्न आकारात असतं .....
पहात स्वप्न खरी होतात ना !..... किती सोस असतो स्वप्नांचा ...
कधी मन भरून उमलतात अन कधी वांझही ठरतात .
हव्याहव्याशा थंडीत प्रभातफेरीला निघालं कि , झाडाखाली पडलेला
शुष्क पानांचा सडा हटकून लक्ष वेधून घेतो....
जराशान वाऱ्याच्या लकेरी बरोबर पानं विखुरतात इकड तिकडं .....
झाड त्रयस्थपणान पहात असतं पानगळ , खरं त्याचा हा अटळ भोगच !
आतल्या आत त्याचीही केवढी घुसमट होत असेल, पण एक ताठा कायम असतो
कित्येक वादळ स्पर्शून गेली तरीही .....
काही झालंच नाही या आविर्भावात .....
कुणी अनामिका गात राहते, विराणी मनाचा ठाव घेते .....काळजाचा ठोका
नेमका चुकतो - अशावेळी .....तिलाही गाण्याची भारी आवड...
गळाही गोड... शब्द स्वरांची पकड हुकमी -आगळीच !
.....गाण्या इतकीच तिला पानगळ प्रिय !
डोळे भरून ती तासन तास न्याहाळत बसायची .....
शुष्क पानांवर थबकलेले दवबिंदू तिच्या नजरेतून
सुटत नसत .....पानगळी बरोबरच तिची आठवण
मन भरून रहाते.....
तिच्या स्वरात स्वर मिळाला नाही हि खंत.....
डोळे पाणावतात .....पुन्हा एका पानगळीच्या मोसमात
ती हरपून गेली......आत्ता फक्त पानगळीच्या न संपणारया आठवणी .....
मन-पानगळ असह्य वाटू लागते
.........आताशा मान कशातच रमत नाही .....
घरातल्या रंगीबेरंगी फुलपाखारानीही मन हरखून जात नाही .....
तीही निःशब्द.....स्वःतामध्ये हरपलेली वाटतात .....!

खिडकीतून डोकावणारी बोगनवेलही परकी वाटू लागते.....
मधूनच वाजलेली "कॉल बेल" हि कर्कश वाटते , काळीज कापीत जाते
निर्भयी ....आतला आवाजच हरपताना मनभर भीती दाटून राहते
भयाण वाटू लागतं ...

गर्द काळोखी आव्हानं पेलत पेलत कुठ्पर्यंत जाणार ....वाट नेईल तिकडे....
वाटही लांबच लांब क्षितिजापार न संपणारी .....
कधी काळी भलीथोरली आव्हानं पेलली -हिमतीनं ....
आताशा वाऱ्याच्या झोतान मोडून पडण्याची भीती
मनभर दाटून राहते .....
साऱ्याच वाटा गोठलेल्या.....
धाय मोकलून रडताही येत नाही .....आणि खदखदून हसताही नाही येत.....
सारच असह्य ....हातावरच्या रेषा अवेळीच बदलून भविष्यच हरवावं हि जीवघेणी वेदना कुरतडत राहते
शरीरभर.....मनभर.....सर्वदूर !
......तिमिर गर्भी आव्हानांचे झुंडच्या झुंड जवळ जवळ येताना वारयांच्या झोताबरोबर
शुष्क पानांचा काफिला सरकतो पुढे पुढे ....
झाड स्वःतामध्ये हारवून जात .....
फांदीफांदीतून पानगळीची वेदना सोसत सोसत......!No comments:

Post a Comment