Wednesday, September 26, 2012

ऋणमुक्त


सहज सहज टाकुन गेलास
ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी.

दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस ?

कधिही
न ढळणारा तो दवाचा थेंब
तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.
कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..

– इंदिरा संत