Wednesday, December 14, 2011

पावसाळ्यातली संध्याकाळपावसाळ्यातली संध्याकाळ,
आभाळ आलं अंधारून,
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

फांद्यांचे हिरवे रावे
भिजून गेले,
ओले चिंब पंख मिटून
निजून गेले!

समोर सगळं धुक धुक पसरलंय,
पायाखालची वाटसुद्धा विसरलंय!

पाखरांची चाहूल नाही:
प्रत्येकाच्या घरट्याच 
दार जणू बंद आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

सांगायचं ते कळलं आहे
इतकं खोल,
इतकं खोल:
तुही अबोल 
मीही अबोल!

तुझं माझं असणं हीच भाषा आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

भरून आल्या मौनाला
मातीचा ओला ओला गंध आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

हातात हात गुंफून
असं चालताना,
अबोलपणात
अपर असं होताना,
नाच रे मोरा,
नाच रे मोरा,
शब्द आज विसरून गेलेत आपला तोरा!

मी आज
तुझ्यावरच्या कवितेचा
हळुवार छंद आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

No comments:

Post a Comment