Sunday, December 18, 2011

विश्वास


उच्चार करू नये विश्वासाचा ,
तो डोळ्यात जपून धरावा शब्दातीत :
पहाटेच्या सुकुमार आभाळासारखा 

हक्कांच्या हिशोबी हुकमतीतून
विश्वास पहावा उडून जाताना 
पाखराच्या कुडीतून प्राण जावा तसा 

विश्वास असावा लय जगण्यातली,
जगणे व्यापणारी अतर्क्य बंदिश 
हिवाळ्यातल्या झाडांची सुजाण समजूत 

थंडगार धुक्याचे ढग वहाताना अंगावरून 
दिसत नव्हतो एकमेकांना. शब्द नव्हते.
विश्वास होता. जसे आपण होतो.

: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment