Wednesday, December 14, 2011

जन्म

मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये.

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती.
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.

No comments:

Post a Comment