Tuesday, November 22, 2011

मी अंधार होऊन लपले होते


मी अंधार होऊन लपले होते
दर्‍यांत, खोर्‍यांत, गुहागुफ़ांत
झाडावेलींच्या कुंजाकुंजात
माझे अंधारपण संरक्षीत.

मी वाळू होऊन दडले होते
नदीत, सरोवरात,
सागराच्या अथांग सखोलतेत
माझे लहानपण जपून ठेवीत.

मी पाचोळा होऊन विखुरले होते
रानावनात, धुळीत
एकांतात बसलेल्या वृक्षांच्या मुळाजवळ
माझे पिवळेपण लपवीत.

तू आलास माझ्या कणाएवढ्या मीपणावर
न्याहाळणार्‍या
आर्द्र नजरेतून
समर्पण शिंपडीत थबकलास.

आता अंधार चांदण्यांनी लहरतो आहे,
वाळूवर मोत्यांचे पाणी चढते आहे
पाचोळ्याच्या पिवळ्या शिरांत
हिरवी कळ तटतटते आहे
मला भीति वाटते आहे;

म्हणून मी अंधार होऊन लपते आहे
तुझ्या डोळ्यात, तुझ्या मनात,
माझ्यापासून तुझे संरक्षण
करण्यासाठी. : इंदिरा संत 

No comments:

Post a Comment