Tuesday, November 22, 2011

येता पाऊस पाहुणा

येता पाऊस पाहुणा
आलं हिरवं उधाण
डोंगरतुन फुटलं
हिरवळीचं धरण

रान हिरव्या लोंढ्यात
जाता अवघं वाहून
पानं पाउस पिऊन
गेली नवीन होऊन

ऊन पकडाया सर
आली धावत दारात
कशी रमली दोघंही
पाठशिवीच्या खेळात

पाणी वाहते लावुनी
अंगी मातीचं उटणं
तरी नभाने राखलं
कसं त्याचं निळेपण

रेषा आखुनि पानात
थेंब डाव मांडतात
छेड काढता झुळूक
आपसांत भांडतात

उतरवून लकेरी
निळ्या कागदाच्या वर
तळं पसरत गेलं
काठ सोडुन बाहेर

टाळ्या वाजवत गेली
फुलपाखरं मजेत
जणू फुलंच निघाली
देठावरूनी उडत

सारी पाखरे उतारु
करतात किलबिल
दिला झाडाने ऋतुला
गर्द हिरवा कंदील! नलेश पाटील 

No comments:

Post a Comment