Saturday, November 19, 2011

कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होऊन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरून जाते?
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरुन जाते?
कळत जाते तसे कश्या मूर्ती सार्‍या झिजून जातात?
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात?
शब्द सारे मिटून कसे तळ्यामध्येच पेंगू लागतात?
कळत जाते तसे कश्या दूरच्या घंटा ऐकू येतात?
दूरचे रंग, दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव?
रागरोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव: बा. भ . बोरकर 

No comments:

Post a Comment