स्वप्नी दूर दिसावी कविता.. जाग येता उशाशी असावी कविता ..! घोट भर कधी प्यावी कविता .. अर्घ्य म्हणून द्यावी कविता ..! गज-यात सखीच्या माळावी कविता .. कज-यात तीच्या भाळावी कविता ..! प्रेमात तीच्या सुचावी कविता.. प्रेमभंगात खरी कळावी कविता ..! चंदनासम उगाळता झिजावी कविता .. कस्तुरीसम न दिसता गंधावी कविता..! जाता जाता बीजासम पेरावी कविता.. येताना फुलासम बहरावी कविता..! अनंतीच्या प्रवासी निघावी कविता.. पोटी पुन्हा कुणाच्या अंकुरावी कविता..!!! श्वास बनुनी हृदयी वसावी कविता.. प्राणवायू बनुनी शरीरी रुजावी कविता..!! 'मी' पणा बनुनी माजावी कविता.. नम्र राहुनी जगी गाजावी कविता..!! पावसात अश्रूंच्या भिजावी कविता.. चांदण्यात सुखाच्या हसावी कविता..!! मरता मरता अचानक जगावी कविता.. अन कुणाचे आयुष्यच व्हावी कविता..!! आयुष्यगीत गाता समजावी कविता.. मरण सामोरे येता उमजावी कविता..!! : विनायक
आता नसून आहे , तेव्हा तुला नकोसे शृंगारसाज झाले आताच का हवेसे ? तेव्हा असून बाग नव्हता फुलांस गंध , हृदयास का धरावे गजरे अतास बासे ? तेव्हा असून आग तापू दिली न तयार , आता जीवास मार देतेस का मुकेसे? तेव्हा असून सज्ज खेळू दिले न रंग , आता उदास होशी काळ्यानिळ्या प्रकाशे ? पाऊस श्रावणाचा तेव्हा उन्हास येतां गेलीस कोरडी कां होऊन कां असेसे ? कंठात चातकाची तेव्हा तहान होती , डोळ्यात मीठपाणी आत्ता कशास ऐसें ? आता नसून आहे , तेव्हा असून नव्हतो, सलगी कशास आता ? निष्प्रेम हे उसासे ! : निष्प्रेम :नक्षत्रांचे देणे : आरती प्रभू